लोक जालपत्रे का लिहितात हा मला पडलेला नेहमीचा प्रश्न आहे. त्यात रोहित जालपत्र का लिहितात हे अधिकच कोडे आहे. आपण त्यांच्या जालपत्रावर एकदा नजर टाकून यावी म्हणजे आपल्याला पण काही प्रश्नांचि उत्तरे कदाचित मिळतील, पण आपण हे जालपत्र का वाचले ते कळले नाही तर मला दोष देऊ नका बरं.
आपण आपले प्रश्न घेऊन बसलोय आणि ते बघा मंजिरी चे जालपत्र चक्क हाका मारतेय हो आपल्याला. मंजिरी यांनी आपल्या आयुष्यात येणा-या हाकांचे नाजुक वर्णन केले आहे ते वाचायलाच हवे नाही का. मंजिरी यांच्या जालपत्रामधे आज आपल्याला बरेच अनुभवाचे बोल वाचायला मिळतील. जसे;
जाणकार नव-यांना म्हणे, `अहो ऐकलं का' किंवा 'मी काय म्हणते,' एवढ्यावरुनच आपल्या खिश्याला पडणा-या भोकाच्या आकारमानाचा बरोबर अंदाज येतो. अर्थात त्यासाठी बारा चौदा वर्षाची तपश्चर्या लागते.
आजकाल जे ऐकावे ते नवलच बुवा. आता पन्ह म्हटलं की कैरी आलीच हो ना, पण हे काय या जालपत्रावर चक्क कैरी नसलेलं पन्ह कसं करतात याची नोंद वाचा. आंबा कैरी याच मालेत आठवतो तो मोहोर, आमराई आणि कोकीळा. प्रवर्तक आपल्या कोकिळा कवितेत काय म्हणतात ते बघा. आणि मग खट्याळ आभाळ भरून येतं लगेच. मग मनबावरी काय म्हणते माहित आहे;
आभाळ भरुन येतं न जेव्हा.....
तू बरसतोस.....माझ्या नेत्रान्मधुन
मी सुखावते तुझ्या कोमल स्पर्षाने......
जेव्हा तू ओघळ्तोस....माझ्या गालावरुन......
आता थोडेसे विद्न्याना विषयी. मराठी मधे देखील अशी सखोल तांत्रिक माहिती व विश्लेषण वाचायला मिळाले आणि बरे वाटले आज. तुम्हीही बरे वाटून घ्या आनंदघन यांचे जालपत्र वाचून.
आजचा विनोदाचा भाग खोडसाळ यांच्या जालपत्रावर जाऊन घेऊया, आज ते लिहितात;
गंधाळला वारा वाहे घरभरी
धुवाया घेतले मोजे तुझे
मायेची सावली माहेरी विसावा
इथे ना विसावा, त्रास तुझा
माझी मराठी हे जालपत्र मी बरेच दिवसांपासून वाचायचा प्रयत्न करतोय. अहो, तिथे काय नविन आहे, कुठे वाचायचे काही पत्ता लागेत तर शपथ. इतके दुवे पहिल्याच पानावर आहेत की कुठे जावे कळेना. त्यापेक्षा सुरेश भटांच्या आठवणीत गुंग झालेल्या धोंडोपंतांच्याच जालपत्रावर आमची गाडी वळली. धोंडोंपंत म्हणजे सुरेश भटांचा पंखा दिसतात. हा शब्दप्रयोग माझ्या आग्ल शिक्षणाचा परिणाम आहे त्यामुळे वाचकांनी तेवढा चालवून घ्यावा.
मराठी जालपत्रे म्हणजे विविधतेने नटलेला साहित्याचा खजिनाच असे माझे आता ठाम मत झाले आहे. पण अजुनही फार लोक लिहित नाहीत. वेळ नसतो म्हणायचा आणिक काय, हो पण जे जे लिहिल्या जाते ते वाचण्याचा आता छंद जडलाय. आपले या जालपत्रावर स्वागत आहे. आपण इथे कसे आलात? म्हणजे कोणी दुवा दिला हो? मला कळवा आणि आपल्या मित्रांनाही कळवा बरं.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें