रविवार, 8 अप्रैल 2007

तुझं माझं गणित सांग जुळणार तरी कधी ?

आज मराठी मधे भरपूर तांत्रिक माहिती वाचायची असेल तर मिलिंद भांडारकरांच्या जालपत्राला भेट द्यायलाच हवी. उपक्रम हे संकेतस्थळ आणि म संकेतस्थळ यांच्या तब्येतीची तपासणी त्यांनी कुशलतेने केली आहे आणि मुख्य म्हणजे ती समजावून सांगितली आहे. या तांत्रिक माहितीवर अजुन थोडी भर घालायला येत आहे कृष्णाकाठचे जालपत्र आणि मायक्रोसाफ्ट आणि एपल कंपन्यांमधली ताणाताण आणि देवाण घेवाण समजावून सांगताहेत.

हे सगळे तांत्रिक वाचून झाले आणि थोडे खाण्याची इच्छा झाली तर भरली कारली कशी करतात हे एकदा बघून या. मला कारली खूप आवडतात (मी साफ खोटे बोलतोय) पण जगात माझ्यासारखे अनेक असतात असे ऐकलेय.

इकडे अभिजीत दाते दिलखुलास पणे आपले संगणक शास्त्र बाजूला ठेऊन तिला स्पष्ट विचारताहेत की तुझे माझे गणित सांग जुळणार तरी कधी?

तू करशील काहीतरी डेव्हलप , मी ते करणार टेस्ट
मी शोधले डिफ़ेक्ट तर तू म्हणणार त्यांना वेस्ट
दोघांमधल्या भांडणामध्ये कुणालाच नाही रेस्ट
वाद आपले संवादात बदलणार तरी कधी ?
तुझं माझं गणित सांग जुळणार तरी कधी ?

आज खोडसाळ एका संकेत स्थळाचा दुवा देऊन आपल्याला पोटभर हसण्याचा सल्ला देताहेत. संकेत स्थळ ठार कसे मारावे असे काहिसे त्या लेखाचे गमतीदार नाव आहे.

आपल्या मराठी बद्दल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष काय म्हणाले आणि त्यांना काय काळजी वाटते हे आज सांगताहेत अजित ओक त्यांच्या उगाच उवाच या जालपत्रामध्ये.

जयश्री नात्यांचा मोहोर घेउन येताहेत.

का गुंतत जातो आपण
नात्याच्या गुंत्यात
का आवळत जातो गाठी
अपेक्षांच्या बंधनात

आज कवितांची बरसात आहे जालपत्र जगात. एक कविता ओंकार सादर करतात आहेत आणि प्रियेला आर्त साद घालतात आहेत ती अशी.

नाही आयुष्याला अर्थ काही
ग सजणे तुझ्याविना,
नाही शक्य ग माझे जगणे
आता प्रिये तुझ्याविना.

अत्यानंद आज त्यांच्या एका शाळेतल्या आठवणीने आपल्याला भारून टाकताहेत. त्यांचे साधे लिखाण आणि प्रांजळपणा याने वाचतांना चित्र उभे राहते.

आज कवितांचा दिवस आहे आणि पुन्हा एक कविता घेऊन येतात आहेत मनबावरी. त्यांचे म्हणणे आहे की तू आहेस तसाच बरा आहेस.

तू वास्तवतेत जगणारा
मी कल्पनेच्या दुनियेत वावरणारी
मी स्वप्नान्चे मनोरे रचणारी
पण तू काळ नि वेळ ह्याचे भान राखणारा

त्यांच्या आजच्या कवितेत अमित डांगे सांगताहेत की ती कशी निघून गेली.


ती अशी निघून गेली
घणाघाती घाव घालून गेली
ह्रदयाच्या ठिकर्‍यांना
पायदळी तुडवून गेली

जिनसा जमा करण्याच्या सवयी विषयी आणि आठवणी काढताहेत केतन त्यांच्या असंच आपलं या जलपत्रावर. नेमसेक पुस्तकावर विचार प्रकट झालेले वाचा इथे.

धोंडोपंत आज आपल्या असंख्य (?) चाहत्यांचे भरपूर आभार मानतात आहेत त्यांच्या तेच उवाचं या जालपत्रावर. अल्लादियाखां पुण्यतिथी समारोहाबद्दल सांगताहेत आनंदघन.

चला तर मग आजची जालपत्र चर्चा आटोपती घेतो पुन्हा भेटू उद्या, उद्याच्या जालपत्रांची चर्चा करायला.

शनिवार, 7 अप्रैल 2007

गेले सगळे कुठे?

जालपत्रांना काय जाहले? गेले सगळे कुठे?

आज जालपत्रवीर पांगले आहेत, आजच्या जालपत्रांची चर्चा पण उद्या च्या जालपत्रात करूया, बराय तर मग

शुक्रवार, 6 अप्रैल 2007

नाही म्हणायाला तुझे, हे आपुलेपण राहिले

नमस्कार मंडळी.

लोक जालपत्रे का लिहितात हा मला पडलेला नेहमीचा प्रश्न आहे. त्यात रोहित जालपत्र का लिहितात हे अधिकच कोडे आहे. आपण त्यांच्या जालपत्रावर एकदा नजर टाकून यावी म्हणजे आपल्याला पण काही प्रश्नांचि उत्तरे कदाचित मिळतील, पण आपण हे जालपत्र का वाचले ते कळले नाही तर मला दोष देऊ नका बरं.

आपण आपले प्रश्न घेऊन बसलोय आणि ते बघा मंजिरी चे जालपत्र चक्क हाका मारतेय हो आपल्याला. मंजिरी यांनी आपल्या आयुष्यात येणा-या हाकांचे नाजुक वर्णन केले आहे ते वाचायलाच हवे नाही का. मंजिरी यांच्या जालपत्रामधे आज आपल्याला बरेच अनुभवाचे बोल वाचायला मिळतील. जसे;


जाणकार नव-यांना म्हणे, `अहो ऐकलं का' किंवा 'मी काय म्हणते,' एवढ्यावरुनच आपल्या खिश्याला पडणा-या भोकाच्या आकारमानाचा बरोबर अंदाज येतो. अर्थात त्यासाठी बारा चौदा वर्षाची तपश्चर्या लागते.

आजकाल जे ऐकावे ते नवलच बुवा. आता पन्ह म्हटलं की कैरी आलीच हो ना, पण हे काय या जालपत्रावर चक्क कैरी नसलेलं पन्ह कसं करतात याची नोंद वाचा. आंबा कैरी याच मालेत आठवतो तो मोहोर, आमराई आणि कोकीळा. प्रवर्तक आपल्या कोकिळा कवितेत काय म्हणतात ते बघा. आणि मग खट्याळ आभाळ भरून येतं लगेच. मग मनबावरी काय म्हणते माहित आहे;

आभाळ भरुन येतं न जेव्हा.....
तू बरसतोस.....माझ्या नेत्रान्मधुन
मी सुखावते तुझ्या कोमल स्पर्षाने......
जेव्हा तू ओघळ्तोस....माझ्या गालावरुन......

आता थोडेसे विद्न्याना विषयी. मराठी मधे देखील अशी सखोल तांत्रिक माहिती व विश्लेषण वाचायला मिळाले आणि बरे वाटले आज. तुम्हीही बरे वाटून घ्या आनंदघन यांचे जालपत्र वाचून.

आजचा विनोदाचा भाग खोडसाळ यांच्या जालपत्रावर जाऊन घेऊया, आज ते लिहितात;

गंधाळला वारा वाहे घरभरी
धुवाया घेतले मोजे तुझे

मायेची सावली माहेरी विसावा
इथे ना विसावा, त्रास तुझा

माझी मराठी हे जालपत्र मी बरेच दिवसांपासून वाचायचा प्रयत्न करतोय. अहो, तिथे काय नविन आहे, कुठे वाचायचे काही पत्ता लागेत तर शपथ. इतके दुवे पहिल्याच पानावर आहेत की कुठे जावे कळेना. त्यापेक्षा सुरेश भटांच्या आठवणीत गुंग झालेल्या धोंडोपंतांच्याच जालपत्रावर आमची गाडी वळली. धोंडोंपंत म्हणजे सुरेश भटांचा पंखा दिसतात. हा शब्दप्रयोग माझ्या आग्ल शिक्षणाचा परिणाम आहे त्यामुळे वाचकांनी तेवढा चालवून घ्यावा.

मराठी जालपत्रे म्हणजे विविधतेने नटलेला साहित्याचा खजिनाच असे माझे आता ठाम मत झाले आहे. पण अजुनही फार लोक लिहित नाहीत. वेळ नसतो म्हणायचा आणिक काय, हो पण जे जे लिहिल्या जाते ते वाचण्याचा आता छंद जडलाय. आपले या जालपत्रावर स्वागत आहे. आपण इथे कसे आलात? म्हणजे कोणी दुवा दिला हो? मला कळवा आणि आपल्या मित्रांनाही कळवा बरं.

गुरुवार, 5 अप्रैल 2007

जुन्या नादरम्य गाण्याची आठवण

नमस्कार मंडळी. जालपत्र चर्चेच्या पहिल्या पुष्पाला आपण प्रतिसाद आणि इमेल पाठवून प्रेम दिले म्हणून आभारी आहे. आजची चर्चा सुरू करूया.

माझी बदबड अश्या नावाने जालपत्र लिहिणा-या अदिती यांनी आज रितेपणा नावाची झकास गझल सादर केली आहे. अदिती यांच्या कविता म्हणजे नव नव्या कल्पना आणि भाव भावनांचा रम्य खजिना असतो. त्यांच्या जालपत्रावरच्या सगळ्याच कविता वाचून मन साहित्यगुंग होते हे खचितच.


तेंडूची पाने आज तापली आहेत बरं. आपले नेहमीचे काव्यात्मक विडंबन सोडून खोडसाळ आज सरळ धारदार शब्दांसकट कडाडताहेत. मनोगत या संकेत स्थळावर प्रशासनामुळे दुखावलेले बरेच लोक आहेत असे त्यांच्या लेखनावरून सहज लक्षात येते पण मराठीगझल या नव्या सुरू झालेल्या संकेत स्थळावर सुद्धा तसेच काहीतरी पाहिल्याचा दाखला देत ते खेद व्यक्त करताहेत.

आरकूट या संकेत स्थळामुळे मनात येणाऱ्या, रेंगाळणाऱ्या अनेक विचारांना शब्दरूप देण्याचा एक प्रयत्न बडबडी स्नेहल या करताहेत. तर अमेरिकेत किराणा भुसार खरेदी करायला निघाले आहेत वरूण.

गणपत वाण्याच्या माडीचे स्वप्न बा. सी मर्ढेकरांच्या कवितेत वाचा. अमेरिकेतल्या लाकडी माडीच्या घरात राहण्यासाठी जी प्रवेशपत्रे लागतात त्यांची सविस्तर माहिती मिलिंद भांडारकर आपल्या जालपत्रात सादर करताहेत ते पण वाचा.

शैलेश यांना शब्दांचे भारी वेड. ते नवीन मराठी शब्दांचे प्रयोजन मांडताहेत त्यांच्या जालपत्रावर. मिनाक्षी आपल्या दीर्घ कथेची सुरवात करताहेत.

आजचा विनोदाचा डोज़ बच्चन जींच्या पुत्र रत्नाच्या लग्नाच्या तयारीचे वर्णन वाचता वाचता मिळेल.

श्रीनिवास खळे, सुधीर फडके, यशवंत देव, अशोक पत्की, पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या तोडीचा एकतरी संगीतकार महाराष्ट्रात भावी काळात होऊ शकेल? असा प्रश्न विचारत धोंडोपंत एका जुन्या नादरम्य गाण्याची आठवण करून देताहेत.

यांत्रिक शेती आणि त्यांचे सखोल वर्णन आनंदघन यांच्या जालपत्राच्या पान ४३ वर वाचायला विसरू नका बरं.

या जालपत्र चर्चेची बातमी कळल्यावर बरेच मित्रांनी मेल मधे, आरकूट मधे आवड कळवली, त्या सगळ्यांचे स्वागत. आपली आवड या जालपत्रावर पण कळवा की हो. संगिता ताईला नागपुरचा तुषार हे जालपत्र वाचून सापडला. या जालपत्रावर आणि काय काय आवडेल हे पण कळवा बर वाचक हो.

आता मी आजचे जालपत्र थांबवतो आणि माझ्या काही इतर जालपत्रांच्या लिखाणास वळतो. हो, या जालपत्राची प्रेरणा ज्या जालपत्रावरून मिळाली त्या चिठ्ठाचर्चा या जालपत्राला सुद्धा भेट द्या बर.




बुधवार, 4 अप्रैल 2007

मनात आठवणींचा मंजूळ नाद

नमस्कार मराठी रसिक वाचक हो. हिंदी जालपत्रकारांच्या चिठ्ठाचर्चा या जालपत्रावरून प्रेरित होऊन मी हे जालपत्र सुरू करतो आहे. जालपत्र चर्चा या नावाने ते सतत नव नव्या मराठी जालपत्रांच्या आणि जालपत्रकारांच्या गमती जमती आणिक नवे लिखाण आपल्या समोर आणत राहील अशी कामना करतो आणिक प्रथम गणेशाला वंदन करून आपली बडबड (चर्चा हो) सुरू ठेवतो.

धोंडो भिकाजी जोशी या महा जालपत्रकाराशी जाउन भिडलात तर त्याला षडाष्टक योग समजावा. धोंडोपंत यांच्या हातात तर्काचा धनुष्य आणि शब्दांचे बाण भरपूर असल्याची वार्ता त्याच्या कडून जायबंद होऊन परतलेल्या अनेक लोकांच्या खुणा पाहून आम्हास पटली आहे. हेच ज्योतिर्भाषा सततकर त्याच्या जालपत्रावरून ज्योतिष्याबद्दल बरच काही सांगतात ते वाचावे.

राधिकेच्या जालपत्रामधे कोल्हापूरची जुनी शाळा वाचून तुम्हाला तुमच्या जुन्या शाळेच्या आठवणी काढता येतील. तुमच्याही मनात आठवणींचा मंजूळ नाद ऐकू येईल इतके सखोल वर्णन वाचायला मिळेल. हे शाळेतले दिवस वाचून झाल्यावर सासूरवाडीचे ही चार दिवस वाचायला विसरू नका.

सतत नव नवीन माहिती आणि शब्द छटा सादर करणाते संजोपराव आज घेऊन आले आहेत दिवाकरांच्या नाट्यछटा.

पुन्हा एकदा शाळेच्या आठवणींनी आपल्याला गार करतात आहेत अत्यानंद. परिक्षेच्या दिवशी गोट्या खेळण्याची हिम्मत असलेल्या आपल्या भावाची गोष्ट ते सांगताहेत.

वास्तुपुरूष चित्रपटाचा आलेख सांगताहेत सामवेद मिखाईल कसा संगीतात गड्डा आहे ते आपल्याला वाचल्यावर समजेल कसंकाय या जालपत्रावर.

नामवंत कवींच्या जमतील तशा एकत्र संकलित केलेल्या कवितांचा संग्रह आज कुसुमाग्रजांची मौन कविता घेउन सजला आहे. मनबावरीच्या भाववेड्या विश्वात मैत्री म्हणजे काय याचे उत्तर मिळतेय का ते पहा.

झाले जुने पतीचे या विडंबनाचा फवारा घेऊन ग्रिष्माच्या चटक्यांना शांत करणार आहेत खोडसाळ. ते म्हणतात..

झाले जुने पतीचे ते पँट, शर्ट, सारे
बोहारणीस देते, चमचा नवा हवा रे

पत्नीस ड्रेस लागे, पल्लू शिरावरी अन्
मैत्रीण अल्पवस्त्रा चाले बरी तुला रे !

वैभव बंगलोर ला काय गेले की त्यांना जालपत्र लिहिण्याची आणि वाचकांना हसवत हसवत चटका देण्याची बाधा झाली. ते सांगतात आहेत आय. टी. मधे गेल्यावर माणसाचे कोणत्या प्राण्यात रूपांतर होते त्याची कहाणी.

तुम्हाला आवराआवर करायची (वाईट) सवय आहे का? असेल तर कृपया अनु चे हे जालपत्र वाचू नये. असे का नाही करत की ज्ञानेश्वरीमुळे स्फुरलेले विचार वाचा. कृष्णाकाठी जाऊन भीमरूपी महारूद्रा म्हणावे.

बघा दूर जाणा-या वाटेवर उभे राहून अभिजीत सखे ला बोलावताहेत. अनेक जालपत्रांच्या गमती जमती आणि तेथील लोकांबद्दल मार्मिक लिखाण करताहेत पावरबाज मिलिंद भांडारकर‘जी’.

जालपत्रे म्हणजे आठवणी साठवण्याचे मोठ्ठे दालन आहे असे लक्षात येते आहे. ते गेले आणि काय काय ठेऊन गेले ते वाट्टेल ते नावाच्या जालपत्रावर वाचा. आणि मोग-याच्या अहाहा ताज्या फुलांचा आनंद घेत काही कळत नकळत आलेल्या मनातल्या आठवणी इथे वाचा.

वाचकहो! तर ही होती मराठी जालपत्रांच्या दुनितेची आजची फेरी. हा लेखक सुद्धा पोटासाठी दिवसातला बराच भाग काम करण्यात वापरत असल्यामुळे रोज हे जालपत्र चर्चा सत्र करणे जमेल अशी ग्वाही देऊ शकत नाही. या प्रकारेच कुणाला जर जालपत्र चर्चा करायची हौस निर्माण होत असल्यासारखे वाटले तर त्यांचे इथल्या लेखकांमध्ये स्वागत आहे.

तर आता आपली रजा घेतो आणि पुन्हा असेच जालपत्र चर्चा घेऊन इथेच भेटूया म्हणत दिसेनासा होतो. आपल्या सूचना, प्रेम आणि बरेच काही या जालपत्राच्या खाली असलेल्या प्रतिसाद क्षेत्रात ठेऊन जावे ही विनंती.