रविवार, 8 अप्रैल 2007

तुझं माझं गणित सांग जुळणार तरी कधी ?

आज मराठी मधे भरपूर तांत्रिक माहिती वाचायची असेल तर मिलिंद भांडारकरांच्या जालपत्राला भेट द्यायलाच हवी. उपक्रम हे संकेतस्थळ आणि म संकेतस्थळ यांच्या तब्येतीची तपासणी त्यांनी कुशलतेने केली आहे आणि मुख्य म्हणजे ती समजावून सांगितली आहे. या तांत्रिक माहितीवर अजुन थोडी भर घालायला येत आहे कृष्णाकाठचे जालपत्र आणि मायक्रोसाफ्ट आणि एपल कंपन्यांमधली ताणाताण आणि देवाण घेवाण समजावून सांगताहेत.

हे सगळे तांत्रिक वाचून झाले आणि थोडे खाण्याची इच्छा झाली तर भरली कारली कशी करतात हे एकदा बघून या. मला कारली खूप आवडतात (मी साफ खोटे बोलतोय) पण जगात माझ्यासारखे अनेक असतात असे ऐकलेय.

इकडे अभिजीत दाते दिलखुलास पणे आपले संगणक शास्त्र बाजूला ठेऊन तिला स्पष्ट विचारताहेत की तुझे माझे गणित सांग जुळणार तरी कधी?

तू करशील काहीतरी डेव्हलप , मी ते करणार टेस्ट
मी शोधले डिफ़ेक्ट तर तू म्हणणार त्यांना वेस्ट
दोघांमधल्या भांडणामध्ये कुणालाच नाही रेस्ट
वाद आपले संवादात बदलणार तरी कधी ?
तुझं माझं गणित सांग जुळणार तरी कधी ?

आज खोडसाळ एका संकेत स्थळाचा दुवा देऊन आपल्याला पोटभर हसण्याचा सल्ला देताहेत. संकेत स्थळ ठार कसे मारावे असे काहिसे त्या लेखाचे गमतीदार नाव आहे.

आपल्या मराठी बद्दल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष काय म्हणाले आणि त्यांना काय काळजी वाटते हे आज सांगताहेत अजित ओक त्यांच्या उगाच उवाच या जालपत्रामध्ये.

जयश्री नात्यांचा मोहोर घेउन येताहेत.

का गुंतत जातो आपण
नात्याच्या गुंत्यात
का आवळत जातो गाठी
अपेक्षांच्या बंधनात

आज कवितांची बरसात आहे जालपत्र जगात. एक कविता ओंकार सादर करतात आहेत आणि प्रियेला आर्त साद घालतात आहेत ती अशी.

नाही आयुष्याला अर्थ काही
ग सजणे तुझ्याविना,
नाही शक्य ग माझे जगणे
आता प्रिये तुझ्याविना.

अत्यानंद आज त्यांच्या एका शाळेतल्या आठवणीने आपल्याला भारून टाकताहेत. त्यांचे साधे लिखाण आणि प्रांजळपणा याने वाचतांना चित्र उभे राहते.

आज कवितांचा दिवस आहे आणि पुन्हा एक कविता घेऊन येतात आहेत मनबावरी. त्यांचे म्हणणे आहे की तू आहेस तसाच बरा आहेस.

तू वास्तवतेत जगणारा
मी कल्पनेच्या दुनियेत वावरणारी
मी स्वप्नान्चे मनोरे रचणारी
पण तू काळ नि वेळ ह्याचे भान राखणारा

त्यांच्या आजच्या कवितेत अमित डांगे सांगताहेत की ती कशी निघून गेली.


ती अशी निघून गेली
घणाघाती घाव घालून गेली
ह्रदयाच्या ठिकर्‍यांना
पायदळी तुडवून गेली

जिनसा जमा करण्याच्या सवयी विषयी आणि आठवणी काढताहेत केतन त्यांच्या असंच आपलं या जलपत्रावर. नेमसेक पुस्तकावर विचार प्रकट झालेले वाचा इथे.

धोंडोपंत आज आपल्या असंख्य (?) चाहत्यांचे भरपूर आभार मानतात आहेत त्यांच्या तेच उवाचं या जालपत्रावर. अल्लादियाखां पुण्यतिथी समारोहाबद्दल सांगताहेत आनंदघन.

चला तर मग आजची जालपत्र चर्चा आटोपती घेतो पुन्हा भेटू उद्या, उद्याच्या जालपत्रांची चर्चा करायला.